फेक न्यूज! अर्थात, भंपक भरताड

गेली काही वर्षं, बहुधा इंटरनेटच्या प्रसारामुळे, आपल्यावर माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. ती निव्वळ माहिती असती, तर त्याकडे आपण दुर्लक्ष देखील केलं असतं. परंतु ह्यातली बरीचशी माहिती आपल्या भावनिक पातळीवर परिणाम करत असते. त्यामुळे ती झटकून टाकणं तितकंसं सोपं राहत नाही. अगदी नजीकचं उदाहरण घ्यायचं झाल्यास सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) विषयीचा गदारोळ आठवून पहा. CAA आणि NRC योग्य की अयोग्य, त्याला विरोध करायला हवा की बाजू घ्यायला हवी, पोलिसांनी विरोधकांवर हल्ला करणं योग्य होतं का, मुळात भारत धर्मनिरपेक्ष असायला हवा की नको, अशा अनेक मुद्द्यांवरून उभय पक्षांमध्ये इंटरनेट आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून युद्ध सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेला पूरक माहिती आणि पुरावे देत आहेत; सामान्य माणसाची मात्र हे सगळं समजून घेताना आणि आपली भूमिका ठरवताना गोची होत आहे. ही माहिती अनेकदा फेक (fake), अर्थात बनावट असते; परंतु ते ओळखण्याची साधनं सामान्य माणसांकडे उपलब्ध नसतात.

मोठ्या प्रमाणावर होणार्‍या बनावट माहितीच्या प्रसाराचे परिणाम वैयक्तिक न राहता त्यामुळे संपूर्ण समाज आणि देशाची मानसिकता बदलत चालल्याचं दिसतं आहे.

2017-18 साली लहान मुलांच्या अपहरणाविषयीच्या अफवा व्हॉट्सअपवर फिरत होत्या. सिरियातील युद्धात मरण पावलेल्या मुलांचे फोटो वापरून, अतिशय विदारक व्हिडिओ तयार करण्यात आले. ते पाहून लोकांवर इतका परिणाम झाला, की भारतभर अनेक ठिकाणी भटक्या जमातीतील लोकांवर स्थानिक जमावांनी हल्ले केले. मुलांच्या अपहरणाशी सुतराम संबंध नसलेले जवळजवळ 50 लोक मृत्युमुखी पडले, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले.

परिणाम इतके भयंकर असताना देखील, बहुतांश लोक ह्या बनावट बातम्यांच्या आहारी जातात. मिळत असलेल्या माहितीची सत्यासत्यता पडताळण्याचा फार खटाटोप करत नाहीत. ह्यामागे काय कारण असेल, हे समजण्यासाठी आपण जरा मनुष्यवंशाच्या इतिहासात डोकावून पाहूया.

सेपियनी कुचाळक्या

लेखक आणि संशोधक युवल नोआ हरारी आपल्या ‘सेपियन्स’ ह्या मानववंशशास्त्रावर आधारित पुस्तकात मानववंशाच्या एक लक्ष वर्षांच्या इतिहासाकडे पाहतात. तुलनेनं इतक्या कमी काळात मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपेक्षा इतक्या वेगळ्याप्रकारे उत्क्रांत का झाला, ह्याची ते कारणमीमांसा करतात. त्यांच्या मते मनुष्याला गॉसिप (gossip) करण्याची कला अवगत झाली, हे त्यापैकी एक कारण आहे. गॉसिप ह्या शब्दाला मराठीत कुचाळक्या करणं, अफवा पसरवणं असे पर्यायी शब्द आहेत; पण हरारींना अभिप्रेत अर्थ – इतर व्यक्ती अथवा व्यक्तिसमूहाविषयी मारलेल्या गप्पा – किंवा कोकणीत गजाली म्हणतात, असा ‘न-नकारात्मक’ होय. ही ‘कला’ अवगत होण्याअगोदर, ज्यांच्याशी आपला थेट संबंध आणि व्यवहार आहे, तेवढ्याच व्यक्तींबद्दल मनुष्याला माहिती असायची. शिकार करण्यासाठी, आपली मुलंबाळं सोपवण्यासाठी आवश्यक असणारा विश्वास अशाच थेट माहितीतून निर्माण होत असे. अशानं टोळ्यांचा आकार सीमित राहून तो साधारण 100-150 माणसांपर्यंतच मर्यादित राहत असे.

गॉसिप केल्यानं नक्की काय साध्य होतं, तर त्यातून एकप्रकारे माहितीचं संकुचन (compression) शक्य होतं. माहितीचं संकुचन म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊया. प्रत्येक मनुष्याला प्रत्येक नवीन व्यक्तीची थेट ओळख व्हायची म्हटली, तर आपला खूपच वेळ खर्ची घालावा लागेल. त्यापेक्षा त्यांना ओळखणार्‍या मंडळींकडून त्यांच्याबद्दलचं मत जाणून घ्यायला तुलनेनं काहीच वेळ लागत नाही. प्रत्यक्ष ओळखीइतका हा मार्ग विश्वासार्ह नसला, तरी आपली पोहोच कैकपटींनी वाढल्यानं हा मार्ग परिणामकारक मात्र ठरतो. ह्यात गैरसमज आणि फसवणुकीची शक्यता नक्कीच उद्भवते; मात्र त्यातून शिकतच गॉसिपकलेत मनुष्य अधिकाधिक पारंगत होतो.

गॉसिपकलेमुळे आपल्या मित्रांचे मित्र – त्यांचे मित्र अशा मोठ्या समूहांविषयी आपण आपले मत बनवू शकलो आणि काहीच ओळख नसताना त्यांच्याशी व्यवहार आणि सहकार्य करू शकलो. फक्त स्वतःच्या टोळीत वावरणारा मनुष्य आता मोठ्या समूहाबरोबर देवाणघेवाण करू लागला आणि वैश्विकरणाचं (globalization) पहिलं पाऊल पडलं.

वसुधैव कुटुंबकम

आता cut to एकविसावं शतक. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, अध्यात्म, कला असे अनेकांगी विषय समजून घेण्यात मनुष्यानं प्रचंड प्रगती केली आहे. ह्या सर्वच विषयांचं सगळं ज्ञान एका व्यक्तीला असणं अशक्य आहे. त्यात इंटरनेट, डिश टीव्ही अशी माहितीची साधनं घरोघरी पोहोचल्यामुळे, माहितीचे स्रोत मात्र सगळ्यांच्या आवाक्यात आले आहेत. अर्थात, आवाक्यात असले, तरी माहितीच्या व्याप्तीमुळे ती आपल्या कवेत मात्र सामावू शकत नाहीच. आपल्या मेंदूच्या मर्यादा ओलांडून ही माहिती आपल्याला व्यवहारात समाविष्ट करता यावी, म्हणून काही मध्यस्थांची गरज भासते. ह्या मध्यस्थांना आपण गुरू, तज्ज्ञ, विशेषज्ञ, द्रष्टा इत्यादी नावांनी संबोधतो.

उदाहरणार्थ, आता घरबसल्या कोणालाही कंपन्यांचे समभाग खरेदी-विक्री करता येतात. परंतु आपल्याला सर्वोत्तम परतावा मिळावा ह्यासाठी कोणत्या कंपनीचे समभाग विकत घ्यावे ह्याचा अभ्यास प्रत्येकानं करायचा म्हटला, तर ते अव्यवहार्य होईल. त्यापेक्षा बिझनेस चॅनल्सवर आलेल्या तज्ज्ञांची मतं ऐकून, त्याचा मसावि काढून, आपण समभाग खरेदी करण्याचा निर्णय घेऊन टाकतो.

मध्यस्थाद्वारे ज्ञान/ माहिती मिळवण्याची ही प्रक्रिया आणि गॉसिपद्वारे इतर व्यक्तींना ओळखण्याची प्रक्रिया ह्यातील समानता आता बहुधा तुमच्या ध्यानात आली असेल.

गॉसिपबाबत नमूद केल्याप्रमाणे, मध्यस्थांमार्फत मिळालेली माहिती पूर्णपणे विश्वासार्ह नसते. माहितीचा प्रसार करायला वेळ आणि पैसा खर्ची पडतो. त्यासाठी स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करणार्‍याला त्यातून काहीतरी ‘फायदा’ हवा असेल, तर त्यात काही गैर नाही. हां, हा ‘फायदा’ नेहमी संकुचित आणि स्वार्थी असेलच असं नाही; परंतु आपण माहितीचा एक महागडा स्रोत – जाहिराती – पाहिल्या तर लक्षात येतं, की असे ‘निःस्वार्थी’ मध्यस्थ अपवादानंच आढळतात. इंटरनेट किंवा एकंदरच प्रसारमाध्यमांसारख्या मध्यस्थांच्या बाबतीत गुंतागुंत अजूनच वाढते. बहुतांश वेळा हे मध्यस्थ, त्यांच्या धारणा, त्यांचे स्वार्थ आपल्याला माहितीही नसतात. शिवाय हे माध्यम काही अंशी खुलं असल्यामुळे, अनेकविध मध्यस्थ आपापल्या परस्परविरोधी स्वार्थाच्या चष्म्यातून जगाकडे पाहत असतात आणि त्याबद्दलच्या ‘माहिती’चं प्रसारण करत असतात.

गॉसिपची कला आपल्याला उपजतच अवगत असल्यामुळे, आपण ह्या माहितीजंजाळात संचार करत असतो आणि त्यातून आपला फायदा साधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून गूगल, युटयूब, फेसबुक इत्यादी इंटरनेटवरचे व्यापारी आपल्या आवडीनिवडी ओळखायला लागतात आणि आपल्याला एकाच प्रकारचा माल पुरवायला लागतात. व्हॉट्सअपसारखी माध्यमं स्वतः तटस्थ असली, तरी त्यावरून जोडली गेलेली माणसं बहुतांशी समविचारी/ ओळखीची असतात. त्यावरून आलेल्या माहितीचा खरा स्रोत वेगळा असला, तरी ती माहिती आपल्या आप्तेष्टांकडून थेट आपल्यापर्यंत आलेली असल्यामुळे आपला त्याच्यावर सहज विश्वास बसतो. हळूहळू, तेचतेच ऐकून, पाहून, आपली सत्याची व्याख्या एकांगी आणि संकुचित होऊ लागते. ह्या अशा एको चेम्बर्समध्ये (echo chambers) अडकलेले समूहच्या समूह एककल्ली विचार करायला लागतात आणि मग तो प्रश्न वैयक्तिक न राहता सामुदायिक होऊ लागतो. संपूर्ण देशाचं भवितव्य बदलू शकण्याची ताकद अशा एको चेम्बर्समध्ये असते.

मात्र कधीतरी, एखाद्या बेसावध क्षणी, आपण स्वतःच्याच विचारांतली विसंगती पकडतो, आणि मग आपण इतक्या टोकाच्या भूमिकेपर्यंत कसं पोहोचलो ह्याचा विचार करू लागतो. आणि मग काय खरं, काय खोटं ह्या – आध्यात्मिक नव्हे तर व्यावहारिक – प्रश्नाकडे आपण येऊन पोहोचतो.

टु नो ऑर नॉट टु नो

एका गोष्टीचा आधीच उल्लेख करणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपण आपल्यापर्यंत येणार्‍या प्रत्येकच माहितीकणाची सत्यासत्यता तपासायला लागलो, तर आपला सगळा वेळ त्यातच खर्ची घालावा लागेल. त्यामुळे दोन पथ्यं पाळणं इष्ट. पहिलं म्हणजे इंटरनेटवरील आणि त्यातल्या त्यात व्हॉट्सअपवरील बहुतांश माहिती खोटीच असते, हे मनाशी पक्कं केल्यानं संभाव्य धोके कमी होतात. दुसरं, इंग्रजीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे choose your enemy, आपल्याला कुठल्या माहितीचा पाठपुरावा करायचाय हे नीट ठरावा. ही चाळणी लावण्यासाठी तुम्ही स्वतःला खालील प्रश्न विचारा:

1) ही माहिती समजल्यावर तुम्ही खूप भावुक झालात किंवा चिडलात का?

2) ही माहिती तुम्हाला पुढे प्रसारित करण्याची इच्छा होतेय का?

3) ही माहिती समजल्यामुळे होणारं तुमचं मत चुकीचं ठरल्यास, तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला अथवा समाजस्वास्थ्याला धोका संभवतो का?

कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ‘हो’ आलं, तर त्या माहितीच्या खोलात जायची गरज आहे, हे लक्षात ठेवा.

काही उदाहरणं पाहूया:

अ) ‘आपण खात असलेल्या 100 ग्राम चॉकलेटच्या बारमध्ये 16 झुरळं असू शकतात’ असं सांगणारा व्हिडिओ व्हॉट्सअप विद्यापीठात सध्या हिंडतो आहे.

हे वाचून तुम्हाला काय वाटलं? मला आश्चर्य वाटलं; पण मला झुरळं खाण्याबद्दल काहीच अडचण किंवा किळस वाटत नसल्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. परंतु एखादी व्यक्ती शाकाहारी असेल, अथवा झुरळांमुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी साशंक असेल, तर तिनं ह्या बातमीचा जरूर पाठपुरावा करावा.

आ) ‘लसणाच्या 8 पाकळ्या पाण्यात उकळून केलेला काढा प्यायल्यानं कोरोनाच्या विषाणूपासून बचाव होतो’ असा मजकूर फेसबुक आणि व्हॉट्सअपवरून फिरत होता.

ह्याचा छडा लावण्यात आपला वेळ खर्च करायचा का?

वरील प्रश्नावलीच्या आधारे तुम्हीच ठरवा.

फेक न्यूज भेदण्याची शस्त्र-सामग्री

आता, माहितीच्या सत्यासत्यतेचा छडा लावायचा असेल तर तो कसा लावायचा?

प्रथमतः, शक्य असेल तिथे मूळ दस्तऐवज वाचणे. उदाहरणार्थ, CAA विषयी मत ठरवायच्या आधी, तो कायदा काय सांगतो, हे वाचायचा प्रयत्न करायला हवा. बदल मोजके आणि नेमके असल्यामुळे ते समजायला फार कठीण नाहीत. चॉकलेट आणि झुरळांच्या वर दिलेल्या उदाहरणात FDA (अन्न व औषध प्रशासन) चे मूळ नियम वाचणं सहज शक्य आहे. ह्या मूळ दस्तऐवजांचा शोध घेण्यासाठी गूगलला अथवा कोणत्याही सर्च इंजिनला काय प्रश्न विचारायचा (key word) ह्याचा थोडा सराव करणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ, CAA वाचण्यासाठी ‘caa original act’ हे सर्च केल्यास गूगल http://egazette.nic.in/WriteRead Data/2019/214646.pdf हे पान दाखवतो.

तसेच, ‘cockroach in chocolate fda approved’ हे सर्च केल्यास गूगल हे https://www.fda.gov/media/71809/download पान दाखवतो.

अनेकवेळा जुने व्हिडिओ – स्थळ-काळाचे संदर्भ बदलून, वेगळाच रंग देऊन – प्रसारित केले जातात. उदाहरणार्थ, राजस्थानातील भिलवर येथे एका मनोरुग्ण सिंधी माणसाला ऑक्टोबर 2019 मध्ये काही दुकानदारांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ होता. त्याचा संदर्भ बदलून CAA-NRC गदारोळ सुरू असताना दोन परस्परविरोधी गटांनी हा व्हिडिओ प्रसारित केला तो असा:

मनीराम विश्वकर्मा कट्टर हिंदू

@i3maniram

देखो एक बुढे सरदार को भारत माता की जय बोलने पर मुस्लिम ईमान वाले 10 से 12 लोग मिलकर पिट रहे है

@aakashgupta146 @narendramodi

@hrsp2004 @pragyahindu @Raghuna80641990

@RajTiwa56444261 @526Nikita @AmitShah @ChouhanShivraj @imAbhishek_20 @Nationalist_RS @Ptshriprakash

ZIDDI JACK

@ziddijack007

बीजेपी के खिलाफ बोलने वाले इस बुजुर्ग किसी तरह से पिटाई करते हुए…

वाकई में देश बदल रहा है..

फूल तानाशाही…

@LambaAlka @AliSohrab007 @SyedMahiNoor2

@ziddi_zoya_ @BulletRaja8329

भारत सरकार किंवा राज्य सरकारांच्या अधिकृत संकेतस्थळाचा डोमेन बहुतेक वेळा “.gov.in’ किंवा “.nic.in’, असा असतो. त्यामुळे कायद्याच्या किंवा सरकारी आदेशाच्या मूळ प्रतीही अशाच डोमेनमध्ये उपलब्ध होऊ शकतात हे देखील ध्यानात ठेवलं पाहिजे.

कोण काय म्हणालं हे जाणून घेण्यात लोकांना हल्ली फार रस वाटतो. त्यावरून त्या व्यक्तीविषयी किंवा व्यक्तीशी संबंधित गटाविषयी आपलं मत बनवलं जातं. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचं विशिष्ट विधान ज्या भाषणाचा अथवा मुलाखतीचा भाग असेल, ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. अनेक मध्यस्थ मूळ संदर्भ न देता, किंवा वेगळाच संदर्भ जोडून एखाद्यानं केलेलं विधान आपल्यासमोर आणू पाहतात. कधीकधी लिखित मजकूर अथवा भाषणांमध्ये व्यंग आणि उपरोध इतक्या संदिग्ध पद्धतीनं वापरला जातो, की हा मनुष्य नक्की कुठल्या बाजूनं बोलतोय ह्याबद्दल संभ्रम निर्माण होतो. त्याचा फायदा घेऊन काही मध्यस्थ आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा कट-कारस्थानांना बळी न पडता, मूळ भाषण अथवा मुलाखत वाचावी किंवा ऐकावी.

उदाहरणार्थ,

‘old man bharat mata ki jai fake’ असं शोधल्यास खालील संकेतस्थळं आपल्याला सापडतील.

बनावट व्हिडिओ ओळखण्यासाठी पुन्हा सर्च इंजिन्सचा उपयोग होतो. आपल्याला आलेल्या व्हिडिओसोबतच्या मजकुरापुढे ’षरज्ञश’ हा शब्द जोडल्यास आपल्याला त्या मजकुराची पडताळणी करणारी संकेतस्थळं सापडतात.

https://facthunt.in/posts/760/F­CT-CHECK:-Is-an-old-Sikh-man-being-thrashed-for-chanting-Bharat-Mata-Ki-Jai

https://www.boomlive.in/video-of-mentally-ill-man-thrashed-over-personal-enmity-shared-with-communal-claims/

An old video is being falsely shared as ‘old man beaten by Muslim youth for shouting Bharat Mata ki Jai’

https://www.altnews.in/caa-protest-old-video-from-rajasthan-shared-as-elderly-man-beaten-up-by-muslim-youth-in-delhi/

facthunt.in, boomlive.in, factly.in, altnews.in इत्यादी संकेतस्थळं फेक न्यूज आणि व्हिडिओ ह्यांचं पितळ उघडं पाडत असतात.

आता तुम्ही म्हणाल, की शेवटी हेही मध्यस्थच – ह्यांना तरी निःस्पृह कसं मानायचं? तर तसं मानण्याची गरज नाही. आपल्या पुढ्यात वाढलेलं विष असू शकतं अशी शंका निर्माण करून एकप्रकारे ही संकेतस्थळं आपल्याला संतुलन राखण्यात मदत करतात. पुढ्यात आलेलं आंधळेपणानं प्राशन करण्यापासून आपला बचाव करतात.

सर्वसाधारणपणे फेक न्यूज निर्माण करणारी संकेतस्थळं जुनाट पद्धत आणि रचना असलेली असतात. हे गृहीतक शंभर टक्के लागू होतंच असं नाही; पण चाळणी म्हणून वापरायला हरकत नाही.

जाता-जाता

एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. वर दिलेली प्रश्नावली, किंवा पुढ्यात आलेली माहिती बनावट असल्याची खातरजमा करण्याची साधनं ही परिपूर्ण आणि सर्वसमावेशक नाहीत. स्वानुभवावरून त्यात बदल करायला अथवा त्याला जोड देण्याला नक्कीच वाव आहे.

पुढील काळात फेक न्यूजचा थोरला भाऊ, डीप फेक (deep fake), ह्याला देखील आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडी आपल्याला हवे ते शब्द कोंबण्याची शक्यता ह्या तंत्रज्ञानानं शक्य झाली आहे. उदाहरणार्थ, साध्वी प्रज्ञा वगैरेंच्या एखाद्या प्रक्षोभक भाषणातील शब्द आपल्याला मेधा पाटकरांच्या आवाजात ऐकू आले, तर केवढा संभ्रम निर्माण होईल! काल्पनिक विज्ञानकथांमध्ये शोभेल, अशी ही गोष्ट आता शक्यतेच्या परिघात येऊन दाखल झालीये.

हा व्हिडिओ पहा.

ह्यात मनोज तिवारी यांच्या हिंदी भाषणाचा इंग्रजी आणि हरयाणवी भाषेत अनुवाद करून, त्या भाषांमध्येही ते स्वतःच बोलत असल्याचा आभास निर्माण केला गेला आहे. हे कदाचित आपल्याला तितकंसं गैर वाटणार नाही; परंतु मजकूर, आवाज आणि दृश्य यांची हवी तशी सरमिसळ करता आली, तर त्यातून निर्माण होणार्‍या भ्रामक कथानकांची कल्पनाही न केलेली बरी.

फेक न्यूजच्या प्रादुर्भावामुळे आता त्याचं एक समांतर विश्व तयार होताना दिसतंय. एका फेक न्यूजचा संदर्भ दुसर्‍यानं द्यायचा, त्याचा संदर्भ तिसर्‍यानं – अशा कड्या एकमेकांत अडकत भंपक भरताडांच्या साखळ्या तयार होताना दिसतात. त्यांना भेदणं जरा कठीणच होऊन बसतं; परंतु अनेक लोकांनी प्रयत्न केले, तर ते अशक्य नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या फेक न्यूजच्या मुळापर्यंत पोहोचलात, तर ते प्रसारित करून इतरांना सांगणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे तोच प्रश्न पुन्हापुन्हा नव्यानं सोडवण्याचे कष्ट वाचतील.

बहुतांश लोकांना रहस्यकथा आवडतात. स्वानुभवावरून सांगतो, फेक न्यूजचा छडा लावताना आपण रहस्यकथेतील सत्यशोधक असल्याची झिंग चढते. ह्या खटाटोपाचा असाही एक फायदा आहे, हे जाताजाता नमूद करावंसं वाटतं. या भंपक भरताडाचा आवाका प्रचंड आहे; परंतु खंबीरपणे त्याचा सामना करण्यात अद्वितीय आनंद आणि समाधान मिळतं. तुमच्या लढ्यासाठी अनेक शुभेच्छा! इन्कलाब झिंदाबाद!

SanatGanu

सनत गानू  | sanat.ganu@gmail.com

लेखक ओनेईरिक्स लॅब्समध्ये इंजिनिअरिंग विभागप्रमुख आहेत. सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर ह्यांच्या चित्रपटनिर्माणात त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले असून नुकताच ‘अरेबियन नाईट्स’ हा लघुपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला आहे.

टिप्पण्या बंद आहेत.

Blog at WordPress.com.

Up ↑